Tomato Ketchup Subsidy : मित्रांनो टोमॅटो आपल्या स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग आहे. भाजी, सूप, ज्युस, सॉस किंवा केचप कोणत्याही स्वरूपात टोमॅटोची मागणी वर्षभर कायम असते. या मागणीला व्यावसायिक संधीमध्ये बदलण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजना (PMFME) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत टोमॅटो व इतर फळभाज्यांपासून तयार होणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांसाठी भांडवली गुंतवणुकीवर तब्बल ३५ टक्के अनुदान मिळते.
योजनेचा उद्देश :-
ही योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नाशवंत वस्तूंना दीर्घकाळ टिकणाऱ्या, मूल्यवर्धित उत्पादनात रूपांतरित करणे हा आहे. Vocal for Local आणि Local to Global या संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे, तसेच ग्रामीण आणि शहरी भागात रोजगार निर्मिती करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
अनुदानाचा लाभ कसा मिळतो :-
या योजनेअंतर्गत वैयक्तिक उद्योजक, शेतकरी गट, स्वयं सहाय्यता गट (SHG), शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि सहकारी संस्था सर्व पात्र ठरतात. पात्र प्रकल्पासाठी भांडवली गुंतवणुकीवर ३५ टक्के अनुदान मिळते. ही मदत किमान दहा लाख रुपयांपासून ते कमाल तीन कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी लागू आहे. मंजूर अनुदान थेट बँकेच्या विशेष खात्यात जमा केले जाते, ज्याचा वापर नियमानुसार केला जातो.
टोमॅटोवर आधारित उत्पादने :-
टोमॅटो प्रक्रिया उद्योगात विविध प्रकारची उत्पादने तयार करता येतात. यामध्ये टोमॅटो केचप, सॉस, प्युरी, पेस्ट, कॅन टोमॅटो, चटणी, रेडी-टू-ईट पदार्थ, सूप, ज्युस आणि लोणच्यांचा समावेश होतो. ही सर्व उत्पादने देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत चांगल्या किंमतीत विकली जाऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे :-
नवीन उद्योग सुरू करताना आधारकार्ड, रहिवासी पुरावा, पॅनकार्ड, बँक पासबुक आणि सहा महिन्यांचा बँक व्यवहाराचा पुरावा आवश्यक आहे. विद्यमान उद्योगांसाठी उद्योग नोंदणी प्रमाणपत्र, मागील तीन वर्षांचे ऑडिट केलेले ताळेबंद, आवश्यक परवाने, विमा आणि GST संबंधित कागदपत्रे जोडावी लागतात.
अर्ज करण्याची प्रक्रिया :-
अर्ज करण्यासाठी प्रथम pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर जिल्हा संसाधन व्यक्ती प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करते. जिल्हा समितीच्या शिफारशीवर बँक कर्ज मंजूर करते. प्रकल्प पूर्ण झाल्यावर आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर अनुदानाचा लाभ मिळतो.
योजनेचे फायदे :-
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी भांडवली गुंतवणुकीत उद्योग उभारता येतो आणि त्यावर मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते. याशिवाय प्रशिक्षण, विपणन, ब्रँडिंग आणि GI टॅग असलेल्या उत्पादनांना विशेष प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादन बाजारात सादर करून स्पर्धात्मक स्थान मिळवणे सोपे होते.
टोमॅटो केचप किंवा ज्युस प्रक्रिया उद्योग हा कमी जोखमीचा आणि मोठ्या नफ्याची संधी देणारा व्यवसाय आहे. PMFME योजनेच्या ३५ टक्के अनुदानाचा लाभ घेतल्यास उद्योग उभारणीचा आर्थिक भार कमी होतो आणि बाजारपेठेत जलद प्रवेश मिळतो. योग्य नियोजन, दर्जेदार उत्पादन आणि प्रभावी मार्केटिंग यांचा संगम साधल्यास हा उद्योग दीर्घकालीन यशस्वी ठरू शकतो.