Swadhar Yojana : मित्रानो महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे अशा विद्यार्थ्यांना मदत करणे ज्यांना शासकीय वसतीगृहात राहण्याची सोय मिळत नाही. शिक्षण सुरू ठेवताना राहण्याचा खर्च, जेवणाचा भत्ता आणि इतर शैक्षणिक गरजांसाठी शासनाकडून वार्षिक आर्थिक सहाय्य दिले जाते. ही मदत DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.
योजनेचा उद्देश :-
राज्यात महाविद्यालयांची संख्या वाढत असली तरी, विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वसतीगृह उपलब्ध नाहीत. वसतीगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा भाड्याने घ्यावी लागते किंवा खाजगी वसतीगृहात राहावे लागते, ज्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. स्वाधार योजनेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना राहण्याचा आणि जेवणाचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
पात्रता अटी :-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. मागील परीक्षेत किमान 60% गुण मिळालेले असणे बंधनकारक आहे, तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% आहे. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणचा तो स्थानिक रहिवासी नसावा. अभ्यासक्रमाचा कालावधी किमान दोन वर्षांचा असणे आवश्यक आहे आणि प्रत्येक वर्षी किमान 60% गुण किंवा समतुल्य ग्रेड मिळवणे गरजेचे आहे. तसेच, विद्यार्थी शासकीय वसतीगृहात राहात नसावा.
आर्थिक लाभ :-
स्वाधार योजनेत शहरानुसार आर्थिक मदत वेगवेगळी दिली जाते. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाकाठी 60,000 रुपये मिळतात. यात 32,000 रुपये जेवण भत्ता, 20,000 रुपये निवास भत्ता आणि 8,000 रुपये निर्वाह भत्ता समाविष्ट आहेत. महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 51,000 रुपये तर इतर भागातील विद्यार्थ्यांना 43,000 रुपये वार्षिक सहाय्य मिळते. याशिवाय, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना 5,000 रुपये आणि इतर शाखांतील विद्यार्थ्यांना 2,000 रुपये शैक्षणिक साहित्याकरिता दिले जातात.
आवश्यक कागदपत्रे :-
अर्ज करताना विद्यार्थ्याने जातीचा दाखला, महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत किंवा रद्द केलेला धनादेश, उत्पन्न प्रमाणपत्र, गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आणि आवश्यक असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र सादर करावे. विवाहित विद्यार्थिनींसाठी पतीचे उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच, वसतीगृहात प्रवेश न घेतल्याचे शपथपत्र, स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र, सध्याच्या राहण्याचा पुरावा, उपस्थिती प्रमाणपत्र आणि सत्र परीक्षेचा निकालही द्यावा लागतो.
अर्ज प्रक्रिया :-
स्वाधार योजनेसाठी अर्जाचा नमुना शासनाच्या संकेतस्थळावर किंवा खालील लिंकवर उपलब्ध आहे. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. जास्त अर्ज आल्यास निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाते.
अर्जाचा नमुना डाउनलोड करा —
https://drive.google.com/file/d/1dljGxBIsQMVFHlSXtCI2LBHPMkYGMnXL/view?usp=sharing